शनिवार, २९ मे, २०२१

लॉकडाउनमधील फ्लॅटचं मनोगत

                                                             लॉकडाउनमधील  फ्लॅटचं  मनोगत

                                                           तुम्ही मला काही ओळखत नसाल. मीही शहरातल्या आमच्याच  गर्दीतला एक. असतो पडीक आपला . राहायला म्हणावी तर २ लहान मुलं आणिआई बाबा  राहतात माझ्यात .पण कुणाची कुणाशी भेट होणे अवघडच .  पण हल्ली मी खूप खुश असतो . अहो का म्हणून काय विचारता ? गेली जवळजवळ २ वर्ष लॉकडाऊन च्या लपंडावामुळे आई बाई वर्क फ्रॉम होम मुळे घरूनच काम करतात,बाबा हि वर्क फ्रॉम होमच करतात  अन मुलंही घरूनच शाळा करतात. मला त्यांचा एवढा सहवास मिळाल्यावर मी खुश असेनच ना. 

                                                            आधी आईबाई ज्या ९ वाजता जायच्या तो संध्याकाळचा काही पत्ताच नसायचा.कधी घरी लवकर आल्याच  तर दिवाबत होऊ शकायची . अशी प्रसन्न संध्याकाळ त्यांच्याही नशिबी खचितच अन माझ्याही. मुलंही सकाळी जायची ती अधून मधून यायची . अन बाबांचं तर विचारूच नका .आता कुठे तर मुंबई ,उद्या कुठे तर नागपूर,कधी कधी महाराष्ट्राबाहेर कधी देशाबाहेर,पायाला भिंगरी लागल्यागत . कशी ओढ लागायची अश्याने माझी . मला किती वाटायचं माझ्या बरोबरही  कुणीतरी असावं . पण मी तरी काय बोलणार.त्यांची कामं ,शाळाही महत्त्वाचीच . मी आणि ती बेबी आजी ,एकमेकांसोबत . पण ती फार काही मला भाव द्यायची नाही बरं का . पण घ्यायचो जमवून,सर सलामत तो मावशी पचास म्हणून . 

                पण हल्ली चित्र बदललंय . दिवसभर सगळे माझ्या संगतीला असतात . सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत. टेरेसवरच्या रोपांकडेही लक्ष असतं  हल्ली सगळ्यांचं .शिवाय कुठे काय ठेवलंय ,काय संपलंय आम्ही मिळून ठरवतो सध्या . सगळं साग्रसंगीत होतंय सकाळच्या पूजा,घंटीपासून,संध्याकाळच्या शुभंकरोती ,अग्निहोत्र ते रात्रीच्या शास्त्रीय संगीतापर्यंत. दिवसभर मुलांची चिवचिव सुरु असते. बरं वाटतं मलाही . 

                                                            एरवी वेळ नसणारे हे सगळे आता मलाही न्याहाळायला लागलेयत .माझा कान कोपरा बघायला लागलेयत . कुणी झाडांना पाणी घालतं ,कुणी कधी ना केलेली रेसिपी करून बघतं . मुलंही किचन मध्ये हात मारून आलेयत . माझी रंगरंगोटी काय होते .नवनवीन पोस्टर्स ट्राय  केले जातायत . एकूण माझी तरी धम्माल आहे. ह्या सहवासामुळे आमची चांगली गट्टी जमलीय . 

                                                            खरं सांगू का ,हे सगळं जरी खरं असलं तरी मला मनात माहितीय की  हे सगळं २ वर्ष आधी होतं तसंच होणारे परत . मुलांचं माहीतच होतं मला .पाखरं च ती .पंखात बळ आलं की उडून जाणारच . पण हे आई बाबा पण परत आधीसारखे सकाळी गेले कि संध्याकाळी येतील बहुतेक. मग ही  बेबी आजी आणि मीच असू परत  एकमेकांसाठी कदाचित .असं असलं तरी मला मनातून वाटतं,जगावरचं हे संकट सरावं आणि सगळं पूर्ववत व्हावं . सगळयांना आधीसारखं  न घाबरता बाहेर पडता यावं.  कुणाला कुठल्या स्पर्शाची भीती असू नये . माझ्या स्वार्थासाठी मी ह्यांना काही धरून ठेऊ शकत नाही. पण आई बाबा आणि मुलानी ही माझं  हे म्हणणं  ऐकावं  की आताएवढं नसेल पण ह्या आधीपेक्षा जास्त अटेन्शन मला त्यांनी नक्की द्यावं !!

                                    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती !

                                    तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती !!


-सोनाली खरोसेकर लोकरे 

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०

सॉरी नॉट फॉर यु !!



कधी कधीच ऑनलाइन येतेस

त्यातुन कधीतरीच मला हाय म्हणतेस

काहितरी भलंमोठं लिहितेस

आणि विचारल्यावर म्ह्णतेस "सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



मी आपला गुंतत जातो,

तुझ्या रिप्लाइज ची वाट पाहतो,

कधी वाटतं मुद्दाम करत असशील तू,

पण मग स्वतःलाच समजावतो,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



कुणीतरी गैरसमजात कुणावर प्रेम करत असेल,

दुसरी व्यक्तीही प्रतिसाद देतेय,

असं आपलं उगाच समजत असेल,

अवघड जात असेल न त्याला सांगणं ,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



आपलं गुपित आपण शेअर करत असू,

मनात जे चाललंय ते सगळं टाइप करत असू,

आणि कळलं कि चॅट विंडोच चुकिची आहे,

त्याला सांगून काय फायदा,,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



मिळालेला एक नंबर फिरवला,आपल्या स्थळाची माहिती दिली,

आणि कळलं अहो जेवळेकर नाही जवळगेकरांचा नंबर आहे,

स्थळ काही आवडलं नाही,

कसं सांगायचं बुवा,,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



रोझ डे ला तो एक गुलाब घेउन आला,

तिला वाटलं तिच्याकडेच येतोय,

तिने आपला हात पुढे सरसावला,

त्याने गुलाब तिच्या मैत्रिणीला देत म्हटलं,,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



त्यानं वर्षानुवर्ष तिची वाट पाहिली,

पण तिला निर्णय घेणं जमलंच नाही,

त्याचा प्रेमभंग करुन गेली,

सहज म्हणाली जाता जाता,,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"



आयुष्यभर दोघं एकत्र सुखात नांदावी,

वृध्दापकाळाने एकाने साथ सोडावी,

आनंद किती होइल जर,

यमाने म्हटले ,"सॉरी..नॉट फ़ॉर यु!!"





बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

"रिटा"

गेल्या रविवारी मराठीतील "रिटा" पाह्ण्याचा योग आला.सिटीप्राइड कोथरुड ला टिकेट्स मिळवली.मग "पोटोबा" मधे जेवणासाठी गेलो.तिथे जाण्याची माझी पहिलीच वेळ.तिथला मेनू वाचून मी थक्कंच.अहो तिथे चक्क वरणफळं,फोडणीचा भात,फोडणीची पोळी असे पदार्थ मिळतात.हं...पुणे तिथे उणे काय हेच खरं.. मग "वरणफळं","फोडणीचा भात" आणि "पिठलं भाकरी" मागवलं.पोटभर जेवलो आणि थिएटर ला आलो.
आत गेलो आणि पल्लवी जोशी दिसली .अर्थात चित्रपट सुरु झाला होता . "रिटा" शांता गोखले (अर्थात रेणुका शहाणे च्या आई) लिखित "रिटा" ह्या कादंबरीवर आधारीत आहे.हा एका १७ वर्षीय मुलीचा चाळिशिपर्यंतचा प्रवास.एक अशी मुलगी जी १७ व्या वर्षापासुनच घर सांभाळायला सुरूवात करते.तीन बहिणी,नोकरी गेलेले पण सो कॉल्ड अप्पर मिडल क्लास च्या अविर्भावात वावरणारे वडिल,त्यांची साथ देणारी आई आणि रिटाकडेच डोळे लावून बसलेली तिची भावंडं अश्या ह्या फॅमिली मधे एकटीच कमवती रीटा आणि तिची ही गोष्ट म्हणा हवंतर. तारुण्यातच प्रौढ़ जालेली ही रीटा चाळीशीची होईपर्यंत एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते.तो पुरूष म्हणजे साळवी.स्वछ,निर्भय आयुष्य जगण्याची इच्छा असणारी रिटा प्रश्नांमध्ये अशी काही अडकते की ह्या हट्टापायी ती मानसिक रुग्णही होते.त्यातून बाहेर येण्यासाठी तिला आठवते आणि मदत करते ती तिची २२ वर्ष जुनी बालमैत्रिण सरस्वती .सरस्वतीच्या भूमिकेत रेणुका शहाणे पहायला मिळेल.
चित्रपटात मला कुठं कुठं असं वाटलं कि काही प्रसंग अजुन चांगले खुलवता आले असते.जसं रिटा मनोरुग्ण होणं,सरस्वतीचं पर्सनल लाइफ.पण चलता है...अनुभवी रेणुका शहाणेचं दिग्दर्शन खरंच कौतुक करण्याजोगं आहे.शिवाय ती एक अनुभवी नाट्य कलाकार.म्हणुन शंकाच नको.
साळवीच्या भुमिकेत मी पहिल्यांदाच जॅकी श्रॉफ ला मराठीत काम करताना पाहिलं.त्याने भुमिकेला नक्कीच न्याय दिलाय.रिटाच्या भुमिकेत पल्लवी जोशी आहे.तिनेही छान काम केलंय रिटाचं पुढे काय होता? इतर काय विशेष पाह्ण्यासारखं आहे? ह्या प्रश्नांची उत्तर चित्रपट पाहुनच मिळवलेलि बरी नाही का?

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २००९

अफेअर

लग्न झालं आणि आम्हा दोघात वेगळंच सुखद नातं फुलंत गेलं.आत्तापर्यंतचे दिवस एकमेकांना ओळखण्यात सरकन निघून गेले. अनुभव खुपच मजेशीर होता.नवीनच प्रेमात पडल्यासारखा.त्या अनुभवाला मी अफेअर असं नाव दिलं.आणि हे अफेअर असं शब्दात बांधलं....

आमच्या असण्यावर जाऊ नका,
आमच्या नसण्यावर जाऊ नका,
आत्ता तर कुठे ओळख होतीय हळुहळु,
कारण आमचं अजुन अफेअर सुरुय,

असे आम्ही रुसणारंच,
कधी कधी अबोला असणारंच,
रुसवे काढण्यात मजाच वाटते अजुन तरी,
कारण आमचं अजुन अफेअर सुरुय,

तिनं त्याच्यासाठी हे करावं,
त्यानं तिच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम तसंच वागावं,
अजुन सगळं अंदाजच ठरवतायत,
कारण आमचं अजुन अफेअर सुरुय,

डोळे मिटावे आणि त्याची छटा दिसावी,
प्रत्येक सावली तिच्यासारखीच भासावी,
ह्यातुन लक्ष कसं राहील कशात,
कारण आमचं अजुन अफेअर सुरुय,

"अरे संसार संसार" असं अजुन तरी आम्ही म्हणत नाही,
जास्त विचार करायला आम्हाला वेळंच मिळत नाही,
सहा महिने झाले लग्नाला,
पण आमचं अजुन अफेअर सुरुय.