देवा एक दिवस तरी मला तुझे डोळे देशील का ?
बरीच घरं आहेत अशी ज्यांना दुरून पाहावं म्हणते .
त्यांची सकाळ कशी होते ,
दिवस कसा जातो त्यांचा, ते निरखावं म्हणते
बरीच घरं आहेत लाडाची
त्यांना शब्दाने बोलणं शक्य होत नाही
त्यांची ,तिथल्या माझ्या लाडक्या माणसांची
खयाली ख़ुशी पोचत नाही
दुरूनच का असेना त्यांना न्याहावळावं म्हणते
दिवस कसा जातो त्यांचा ते निरखावं म्हणते
मी गेले तिथे तर बहुतेक दचकतील ते लोक
आपण कसे आहोत विसरून ,वरवरचं वागू लागतील लोक
मला माहीतीयत ते कसे आहेत आणि मी त्यांना तसंच ओळखते
म्हणूनच ते माझे लाडाचे आहेत
माझ्या तिथे जाण्याने त्यांनी बदलण्यापेक्षा जसं आहे ,जसं चाललंय तसंच अनुभवावं म्हणते
दिवस कसा जातो त्यांचा ते निरखावं म्हणते
तू कसा आमच्यावर दुरूनच लक्ष ठेवतोस
आम्हाला काय हवं नको त्याचा बरोबर हिशोब ठेवतोस
हवा गेली डोक्यात कि कान पिळतोस
अश्रू आले डोळ्यात तर रडायला खांदा देतोस
माझ्यात तुझ्याएवढी काही शक्ती नाही एवढं सगळं करायला
पण मला आवडेल रे त्यांच्या सहवासात थोडावेळ तरी राहायला
सकाळी सकाळी दोघं चहा घेत असतील , कुणी अधूनमधून पेपर वाचत असतील
जरावेळात किचन मधून पोह्यांचा घमघमाट येईल ,
कुणीतरी बाहेर जाऊन पाणी आलं का बघून येईल ,
चिऊताई लड़ीवाळ अंगणात खेळत असेल
कुणाला पाणी आलं म्हणून गाडी धुण्याची घाई असेल
सकाळ अशीच सर्र्कन सरून जाईल
उशिरा ब्रेकफास्ट झाला म्हणून जेवणाची सावकाश तयारी होईल
परत फोडणी आणि घमघमाट सुटेल
मग हळूच टीव्ही चा हि आवाज कानी येईल
जेवण झालं कि एक छोटीशी नॅप मारली जाईल
गप्पा मध्ये दुपारही सरून जाईल
संध्याकाळी स्वारी कुठेतरी चक्कर मारून येईल
काय झाले कसे झाले बोलत
संध्याकाळचा आमटी भात सर्रकन पोटात शिरेल
दिवे मंद होतील
आवाजही बंद होतील
उद्याची प्लँनिंग करत
माणसं थकून भागून आजचा दिवस संपवतील
असा एकतरी दिवस त्यांच्याबरोबर घालवावा म्हणते
दिवस कसा जातो त्यांचा ते निरखावं म्हणते
