मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

माझी आई ..

 माझी आई .. 


                             दि १४/११/२०२४ रोजी संध्याकाळी ८:४८ वा . माझी आई देवाघरी गेली.ह्याच दिवशी गेलेवर्षी बाबांसाठीचा चौदावा होता . आईची आठवण काही केल्या जात नाही . आईची जागा आयुष्यात खरंच कुणी घेऊ शकत नाही . आई गेली कि एक विचित्र पोकळी निर्माण होते . आपण आयुष्यभर तिचं पिल्लूच असतो .जगात जवळ जवळ सगळ्यांची आई सारखीच असते .निस्वार्थी ,कधीच स्वतःला मह्त्व न देणारी , आधी घरातल्या सगळ्यांचा विचार आणि मग स्वतःचा विचार करणारी . माझी आई तशीच होती प्रेमळ ,मायाळू ..माझ्यासाठी तरी फारच .नितळ कांती ,गोरीपान अशी माझी आई हसली की फार छान दिसत असे. माझे सगळे लाड आईने पुरवले . फार हट्टीपणा करू नये ,वेळ आहे तसे राहावे ,फार आरश्यात निरखू नये असं शिकवणारी माझी आई . स्वतः शांत,कधीही कुणाला दुखावले नाही , दुखावले असेल तरी नकळतच असावे . आम्हाला मात्र खंबीर ,स्वाभिमानी बनवले . दारामागून ऐकू नये, कुणाच्या पाठी कुणाबद्दल बोलू नये असं शिकवणारी माझी आई कधी कुणाच्या अध्यात मध्यात पडली नाही . कधी कुणाचे बोल अंगावर घेतले नाहीत कि कधी कुणाला काही बोललीहि नाही . 

                             आमचे अहोभाग्यच म्हणावे की ती इथं पुण्यात येऊन राहिली आणि आम्ही भावंडं आणि आई बाबांनी बराच काळ सोबत घालवला . पुण्यात आई छान रमत असे . आम्ही आईला सगळं सांगू शकू . तेवढं ती आमच्याशी मोकळेपणाने वागे. कुणाशी बोलावं ,किती बोलावं ह्याची खात्री आईबाबांना नक्कीच आमच्यावर होती म्हणून तेही आमच्या ऑफिस आणि कॉलेज च्या टुप्प्यात सहज मिसळत. खास करून आई. 

                             तिच्या माहेरची ती फार लाडकी . माहेरचं तिचं नाव  "अक्कू ". दोन्ही मामा ,आजी,मावशी ,राजू दादा (काका) दोन्ही मामी यांनी फार प्रेम आणि आधार दिला . तिलाही आणि आम्हालाही . आमच्या वेळेला नेहमी धावून आले सगळे . 


                            सासरची मंडळीही तशीच . काका,काकू आणि सगळी भावंडं बाबांच्या आणि आईच्या आजारपणाच्या काळात भक्कम आधार बनले .

 

                            रश्मी सारखी पाठीराखी बहीण नसती तर आम्ही इथपर्यंत येऊच शकलो नसतो हे वेगळे सांगायला नकोच . 


                            आई आणि बाबा नेहमी सोबत राहिले . त्यांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही . दोघांना एकमेकांची कंपनी आवडत असे . दोघं सोबतच फिरत असत. बाबांना सोडून आई क्वचितच कुठे राहिली . शेवटीही अगदी एकच वर्ष्याच्या अंतराने आईने बाबांना साथ केली. देव करो खरेच दोघांना सात जन्म एकमेकांची साथ लाभो आणि आमच्यासारख्या मुलांना ते आई बाबा म्हणून लाभो .