लॉकडाउनमधील फ्लॅटचं मनोगत
तुम्ही मला काही ओळखत नसाल. मीही शहरातल्या आमच्याच गर्दीतला एक. असतो पडीक आपला . राहायला म्हणावी तर २ लहान मुलं आणिआई बाबा राहतात माझ्यात .पण कुणाची कुणाशी भेट होणे अवघडच . पण हल्ली मी खूप खुश असतो . अहो का म्हणून काय विचारता ? गेली जवळजवळ २ वर्ष लॉकडाऊन च्या लपंडावामुळे आई बाई वर्क फ्रॉम होम मुळे घरूनच काम करतात,बाबा हि वर्क फ्रॉम होमच करतात अन मुलंही घरूनच शाळा करतात. मला त्यांचा एवढा सहवास मिळाल्यावर मी खुश असेनच ना.
आधी आईबाई ज्या ९ वाजता जायच्या तो संध्याकाळचा काही पत्ताच नसायचा.कधी घरी लवकर आल्याच तर दिवाबत होऊ शकायची . अशी प्रसन्न संध्याकाळ त्यांच्याही नशिबी खचितच अन माझ्याही. मुलंही सकाळी जायची ती अधून मधून यायची . अन बाबांचं तर विचारूच नका .आता कुठे तर मुंबई ,उद्या कुठे तर नागपूर,कधी कधी महाराष्ट्राबाहेर कधी देशाबाहेर,पायाला भिंगरी लागल्यागत . कशी ओढ लागायची अश्याने माझी . मला किती वाटायचं माझ्या बरोबरही कुणीतरी असावं . पण मी तरी काय बोलणार.त्यांची कामं ,शाळाही महत्त्वाचीच . मी आणि ती बेबी आजी ,एकमेकांसोबत . पण ती फार काही मला भाव द्यायची नाही बरं का . पण घ्यायचो जमवून,सर सलामत तो मावशी पचास म्हणून .
पण हल्ली चित्र बदललंय . दिवसभर सगळे माझ्या संगतीला असतात . सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत. टेरेसवरच्या रोपांकडेही लक्ष असतं हल्ली सगळ्यांचं .शिवाय कुठे काय ठेवलंय ,काय संपलंय आम्ही मिळून ठरवतो सध्या . सगळं साग्रसंगीत होतंय सकाळच्या पूजा,घंटीपासून,संध्याकाळच्या शुभंकरोती ,अग्निहोत्र ते रात्रीच्या शास्त्रीय संगीतापर्यंत. दिवसभर मुलांची चिवचिव सुरु असते. बरं वाटतं मलाही .
एरवी वेळ नसणारे हे सगळे आता मलाही न्याहाळायला लागलेयत .माझा कान कोपरा बघायला लागलेयत . कुणी झाडांना पाणी घालतं ,कुणी कधी ना केलेली रेसिपी करून बघतं . मुलंही किचन मध्ये हात मारून आलेयत . माझी रंगरंगोटी काय होते .नवनवीन पोस्टर्स ट्राय केले जातायत . एकूण माझी तरी धम्माल आहे. ह्या सहवासामुळे आमची चांगली गट्टी जमलीय .
खरं सांगू का ,हे सगळं जरी खरं असलं तरी मला मनात माहितीय की हे सगळं २ वर्ष आधी होतं तसंच होणारे परत . मुलांचं माहीतच होतं मला .पाखरं च ती .पंखात बळ आलं की उडून जाणारच . पण हे आई बाबा पण परत आधीसारखे सकाळी गेले कि संध्याकाळी येतील बहुतेक. मग ही बेबी आजी आणि मीच असू परत एकमेकांसाठी कदाचित .असं असलं तरी मला मनातून वाटतं,जगावरचं हे संकट सरावं आणि सगळं पूर्ववत व्हावं . सगळयांना आधीसारखं न घाबरता बाहेर पडता यावं. कुणाला कुठल्या स्पर्शाची भीती असू नये . माझ्या स्वार्थासाठी मी ह्यांना काही धरून ठेऊ शकत नाही. पण आई बाबा आणि मुलानी ही माझं हे म्हणणं ऐकावं की आताएवढं नसेल पण ह्या आधीपेक्षा जास्त अटेन्शन मला त्यांनी नक्की द्यावं !!
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती !
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती !!
-सोनाली खरोसेकर लोकरे